पालकमंत्र्यांच्या राखीव दौर्‍याने प्रशासनाची फजिती...वाचा नेमकी काय घडले

Foto

औरंगाबाद- मंत्र्यांचे दौरे म्हटले की, अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडते. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे आज सकाळीच जिल्ह्यात आगमन झाले. विशेष म्हणजे प्रशासनाकडे दौर्‍याबाबत केवळ आगमन व राखीव एवढ्या दोनच शब्दांचा उल्‍लेख असलेली माहिती असल्याने अधिकार्‍यांची चांगलीच फजिती झाली.

 

पालकमंत्र्यांच्या या दौर्‍याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क असलेले प्रशासन पालकमंत्र्यांचे लोकेशन घेण्यात व्यस्त होते.  जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती भयंकर आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जिल्हा आढावा बैठक घेतल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यातच दर दोन आठवड्याला मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, उपलब्ध साधनांची आकडेवारी, दुष्काळी परिस्थितीची माहिती गोळा करण्यात अधिकार्‍यांची सारी शक्ती खर्च होत आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांच्या दौर्‍याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धडकली. पालकमंत्री येणार असल्याचे समजल्यावर अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र पालकमंत्र्यांचा दौरा केवळ आगमन व राखीव या दोन शब्दात आटोपला होता. सकाळी सहा वाजता नाशिक येथून औरंगाबाद कडे प्रयाण आणि दुपारी बारा वाजता औरंगाबादेत आगमन व राखीव त्यानंतर आठ वाजता मंत्री महोदय विमानाने मुंबईकडे रवाना होणार होते. औरंगाबादेत आगमन झाल्यानंतर तब्बल ८ तास मंत्रीमहोदय कुठे असणार याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली. 

 

नाव दुष्काळ दौर्‍याचे...

 

पालकमंत्री दीपक सावंत यांचे सकाळी साडे अकराच्या सुमारास वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आगमन झाले. तेथे मंत्री महोदयांनी दुष्काळ आढावा बैठक घेतली. मात्र याबाबत प्रशासन माहिती देऊ शकले नाही. त्यानंतर मंत्री महोदय टीडी या गावाला भेट देणार असल्याचे बोलले जाते. ग्रामस्थांशी संवाद साधून मंत्री महोदय पाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद चिकलठाणा येथील सामान्य रुग्णालयात बैठक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत मंत्रीमहोदयांच्या राखीव दौर्‍याने प्रशासन पुरते हैराण झाले, यात शंका नाही.